संगमनेर : शहरातील रहेमतनगर परिसरात गोवंश जातीचे मांस तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने रंगेहाथ पकडले. दोन आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या कारवाईत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि दोन वाहने जप्त करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली होती की रहेमतनगर परिसरात दोन वाहनांमधून गोवंश जातीचे मांस साठवले आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने विशेष पथकाने घटनास्थळी धडक देत छापा टाकला. पोलिसांना पाहताच तीन इसमांनी पळ काढला. त्यातील एकाला पकडण्यात यश आले.घटनास्थळी पोलिसांनी दोन वाहने तपासली असता त्यामध्ये सुमारे २,५०० किलो गोमांस आढळले.
पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख (रा. नाटकी, संगमनेर) असा आहे. तर मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या आणि अरबाज सादिक शेख (रा. रहेमतनगर) हे दोघे फरार झाले आहेत. या कारवाईत सुमारे ५.५० लाख रुपये किंमतीची टाटा इन्ट्रा गाडी आणि ६.५० लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली. दोन्ही वाहनांमधून एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.
गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीसाठी पाठवले आहेत. पकडलेल्या आरोपीने पळून गेलेल्या अतीक कुरेशी उर्फ सोन्या याचाच गोमांसावर मालकी हक्क असल्याची कबुली दिली. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही वाहनांसह माल जप्त केला. पंचनामा ‘ई-साक्ष’ अॅपद्वारे नोंदवण्यात आला.
या प्रकरणी अल्ताफ सलीम शेख, मोहंमद अतीक कुरेशी आणि अरबाज सादिक शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.








