आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयास मंजुरी!

0
213

संगमनेर मधील कामगारांसाठी ऐतिहासिक दिलासा!

संगमनेर, २१ जानेवारी : संगमनेर तालुक्यातील सुमारे १०,००० विमाधारक लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठोस मांडणी व शासनस्तरीय समन्वयामुळे शक्य झाला आहे.

महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने दिनांक ४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार संगमनेर येथे सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची संख्या लक्षात घेता, स्थानिक पातळीवर दर्जेदार व तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक होते.

या निर्णयामुळे विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना औषधोपचार, तपासण्या व अन्य आरोग्यसेवांसाठी आता दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

सदर विषयाबाबत आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्याकडे प्रभावी पाठपुरावा केला होता. तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी शासन स्तरावरून स्पष्ट निर्देश देण्यात आले.

या संदर्भात महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने मंत्रालय, मुंबई येथून दिनांक १२ मार्च २०२५ रोजी पत्र जारी करून प्रादेशिक संचालक, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई यांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. हे पत्र आमदार अमोल खताळ यांनी दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आले होते.

या निर्णयाबाबत आमदार अमोल खताळ यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले आहे की,
“संगमनेर येथे कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांच्‍या आरोग्‍य सेवेकरीता सेवा दवाखाना सुरु व्‍हावा अशी मागणी कामगारांच्‍या माध्‍यमातून तसेच खासगी उद्योग समुहाच्‍या वतीने करण्‍यात येत होती. नगरपालिका निवडणुकी दरम्यान शहरातील मालपाणी उद्योग समूहात कामगारांच्या बैठकी दरम्यान याबाबत आपण शब्द दिला होता. नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या समवेत बैठक झाली होती. या संदर्भात पालकमंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करुन कामगारांच्या हितासाठी सेवा दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याचा मोठा दिलासा तालुक्यातील कामगारांना मिळेल.

“संगमनेर तालुक्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवेसाठी भटकंती करावी लागू नये, हीच माझी भूमिका होती. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सेवा दवाखाने संगमनेरमध्ये सुरू करण्यास मान्यता दिली, याबद्दल मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निर्णय संगमनेरच्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.”

या दवाखान्यांमुळे विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना औषधोपचार, तपासण्या व अन्य आरोग्यसेवा आता संगमनेरमध्येच मिळणार असून दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे ज्या कामगारांच्या वेतनातून ESIC ची रक्कम वजा केली जाते, त्या सर्व कामगारांना या दवाखान्याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील असंघटित कामगारांनी या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत. सेवा दवाखाने सुरू झाल्यानंतर संगमनेर परिसरातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होतील आणि कामगार वर्गाला थेट लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here