अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला सक्त आदेश

0
28

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे प्रकार समोर आले असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली, तरी तिची कोणतीही गय न करता कठोर कारवाई करावी, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक गावात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही वाळू तस्कर घरकुल योजनेचा गैरवापर करून बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने संगमनेर मतदारसंघातील विविध गावांमधून प्रवरा नदीच्या पात्राकडे जाणारे रस्ते खोदून बंद केले आहेत. तसेच अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनामार्फत कठोर कारवाई सुरू असून, वाळू तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने व साहित्य जप्त करण्यात येत आहेत. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आमदार अमोल खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

“अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, तिची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाखाली कोणीही गैरफायदा घेऊ नये. या प्रकरणात काही जणांवर गुन्हे दाखलही करण्यात आले आहेत.”
— अमोल खताळ (आमदार – संगमनेर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here