शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी व्दितीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे / सिनारे यांनी चौथा अध्याय व प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी, रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मि रवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्म कीर्तन कार्यक्रम तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे. यानंतर विविध कार्यक्रम होणार आहेत.
मंदिर परिसरातील देखावे ठरताय आकर्षक
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त श्री. वेंकटे सुब्रमण्यन, रियाद, सौदी अरबिया यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्दारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्त कपील चला यांचेवतीने करणेत आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्दाराचे आतील बाजुस करणेत आलेल्या गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखाव्याने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे मुंबई येथून आलेल्या श्री साई सेवक व इतर पालखी पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली.








