आ. अमोल खताळ यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभावी भाषण

0
130

संगमनेरच्या विकासासाठी ठोस मागण्या.

मुंबई (दिनांक ४ मार्च) – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्रासह संगमनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर जोर दिला. त्यांनी राज्यातील औद्योगिक वाढ, कृषी सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना देण्यासाठी सरकारच्या विविध योजनांचे समर्थन केले.

आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचे स्वागत करत, गुंतवणुकीसाठी तयार होत असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. “महाराष्ट्र हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रात असलेल्या अपार संधींचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत,” असे ते म्हणाले.

संगमनेरच्या विकासावर भर

आपल्या मतदारसंघाच्या संदर्भात बोलताना आमदार खताळ यांनी संगमनेरमध्ये ‘मिनी एमआयडीसी’ प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली, जेणेकरून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, कृषी प्रक्रिया उद्योग, शीतगृह वाढवणे, आधुनिक जलसंधारण प्रकल्प राबवणे आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला.

“संगमनेर हा कृषिप्रधान तालुका असून, ऊस, द्राक्षे, डाळिंब यांसारख्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य सुविधा मिळण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत,” असे ते म्हणाले.

यासोबतच, त्यांनी संगमनेरमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि उच्च शिक्षण संस्थांची उभारणी करण्याची मागणी केली, जेणेकरून स्थानिक नागरिकांना उत्तम आरोग्य व शिक्षण सुविधा मिळू शकतील.

आमदार खताळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा दर्शवून सांगितले की, “महाराष्ट्राच्या प्रगतीत संगमनेरची महत्त्वाची भूमिका राहील. सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.”

त्यांच्या या ठोस मागण्या आणि प्रभावी भाषणामुळे विधानसभेतील चर्चेला एक नवा दृष्टिकोन मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here