“कामं होतात, कारण आमदार तुमच्यातलाच आहे!”

0
38

संगमनेर : विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी काही महिन्यांपूर्वी सुरु केलेले जनसंपर्क कार्यालय आज खऱ्या अर्थाने जनतेसाठी आधारवड ठरले आहे. दिवसेंदिवस या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे.

पूर्वी कोणाचे रेशनकार्ड, तर कोणाचे नाव कमी-जास्त करणे, डिपी जळणे, रस्ते खराब असणे, नोंदणीकृत तक्रारी न सोडवणे अशा छोट्या मोठ्या समस्यांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागत होते. अनेक वेळा एजंटांच्या माध्यमातून पैसे देऊनसुद्धा कामे रखडलेलीच राहत होती. परिणामी सामान्य माणूस त्रस्त होत होता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी या सगळ्या प्रक्रियेला दिशा देत, नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः पुढाकार घेतला.

आज हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहते, आणि शक्य तितक्या कमी वेळेत त्या सोडवते. विशेष म्हणजे येथे कुणालाही एक रुपयाही द्यावा लागत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. कामांची गती आणि पारदर्शकता यामुळे जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. आमदार अमोल खताळ हेही आपल्या प्रत्येक भाषणात स्पष्टपणे सांगतात की, “तुमच्याकडे कोणी कामासाठी पैसे मागितले, तर थेट आमच्याशी संपर्क साधा. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” अशी खुलेपणाची भूमिका घेणारे आमदार आजपर्यंत क्वचितच पाहायला मिळाले आहेत.

गेल्या काही महिन्यांत या कार्यालयातून हजारो तक्रारी सोडवण्यात आल्या असून, कामाचा वेग आणि जबाबदारी हीच या कार्यालयाची खरी ओळख बनली आहे. त्यामुळेच आज हे जनसंपर्क कार्यालय सामान्य जनतेसाठी केवळ कार्यालय न राहता, एक विश्वासाचे प्रतीक आणि आधारवड बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here