संगमनेर : तालुक्यातील पिंपळे गावातील अवैध स्टोन क्रशर, देवस्थानाची बेकायदेशीररीत्या विकलेली २५० एकर जमीन आणि शासनाची बुडवलेली रॉयल्टी वसुल करण्याच्या मागणीसाठी गावातील शेतकरी आण्णासाहेब चकोर व रमेश ढोणे यांनी ३० सप्टेंबर २०२५ पासून विठ्ठल मंदिरासमोर उपोषण सुरू केले होते. ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता आणि अनधिकृत उत्खनन याविरोधात ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत होते.
या आंदोलनानंतर उप प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल आणि त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार धीरज मांजरे यांनी नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या मार्फत उपोषणकर्त्यांना दिले. या लेखी आदेशानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
पिंपळे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी जानकुबाबा ढोणे यांनी २५० एकर जमीन दान दिली होती. त्यावेळी मंदिर विश्वस्त समिती स्थापन झाली होती. मात्र, कालांतराने समितीतील सर्व सदस्यांचे निधन झाल्यानंतर मंदिराची देखभाल पिंपळे ग्रामपंचायतीकडे आली. डोंगराळ परिसराचा फायदा घेत तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी तब्बल अडीशे एकर जमीन स्टोन क्रशर धारकांना विकली आणि महसूल विभागाची परवानगी न घेता अवैध स्टोन क्रशर सुरू केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप करून गेल्या दोन दशकांचा ग्रामपंचायतीचा कारभार तपासावा, देवस्थानाची जमीन परत मिळवावी आणि बुडवलेली रॉयल्टी वसूल करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्याचबरोबर अवैध स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीही करण्यात आली.
या उपोषणाची माहिती भाजप अभियंता सेलचे राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी आमदार अमोल खताळ यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदारांना कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर सौ. नीलम खताळ, अभियंता शेळके, हरिश्चंद्र चकोर आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून तपासणी करून दोषींवर कारवाई होईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले.








