आदिवासी जमीन बळकवणाऱ्यांचा ‘आका’ कोण? ढोलेवाडीत राजकीय दबावाने कवडीमोल भावात जमीन गुंडळण्याचा प्रयत्न

0
39

संगमनेर : तालुक्यातील बहुचर्चित आदिवासी जमीन घोटाळ्यातील पुन्हा एक प्रकार आता उघडकीस आला आहे. राजकीय आश्रय घेऊन आदिवासी समाजातील एका कुटुंबाला बेघर करून त्याची जमीन स्वतःच्या फायद्यासाठी नेत्याच्या घशात घालण्याचा घाट काही नेतेमंडळीने केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ढोलेवाडी येथे आदिवासी कुटुंबातील सीताबाई सुर्यवंशी व योगेश सुर्यवंशी यांच्या मालकीहक्क जमिनीतील 300 गुंठे क्षेत्र जिरायत दाखवून, न्यायालयात दोन दावे असताना जमिनीचा व्यवहार करून त्यांना दमदाटी करत जमीन नावावर केली. असा आरोप सुर्यवंशी कुटुंबाने आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर आयोगाने सुनावणी घेऊन आदिवासी खातेदाराकडुन बिगर आदिवासी खातेदार यांना खरेदी दस्त करताना नियमांची पायमल्ली झाल्याचे आयोगाचे निदर्शनास आले असुन त्यांनी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे, आदिवासी जमीन कवडीमोल भावात गुंडळणाऱ्या संगमनेरातील राजकीय पुढाऱ्यांच्या “आका”चे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरालगत ढोलेवाडी आहे. ते शहरालगत असल्याने तेथे गुंठ्याला लाखोंचा भाव आहे. त्यामुळे, या भागावरील पडीत जमिनीवर अनेकांचा डोळा असतो. असाच मोठ्या नेत्याचा राजकीय अश्रेय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आदिवासी जमीन बळकवल्याचा आता आरोप होत आहे. ढोलेवाडी येथे आदिवासी कुटुंबातील सीताबाई सुर्यवंशी व योगेश सुर्यवंशी यांचे सामाईक क्षेत्र आहे. या क्षेत्रावर इतर हक्कात महाराष्ट्र जमीन अधिनीयम 1966 चे कलम 36 अन्वये हस्तांतरास बंदी असा सातबाऱ्यावर शेरा आहे. हे क्षेत्र राष्ट्रीय महामार्गा लगत असल्याने या जमिनीला भाव प्रचंड आहे. त्यामुळे, जमीन स्वतः च्या फायद्यासाठी गिळंकृत करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक, राजकीय, धनदांडगे यांचा या जमिनीसाठी सुर्यवंशी कुटुंबाला कायमच त्रास सुरू होता. यामध्ये कारखान्याचे संचालक अभिजीत ढोले व प्रवीण अभंग यांनी त्यांच्या कुटुंबातील सहीहिश्येदारा मध्ये फुट पाडली. तक्रारदार यांचा पुतण्या गोरख सुर्यवंशी याला अमिश दाखवुन त्याच्यासोबत संगनमत करून अडाणी अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेऊन सुर्यवंशी कुटुंबाची फसवणूक केली. त्यांच्याकडून 30 सप्टेंबर 2013 रोजी साठेखत नोंदवून घेतले. तसेच बागायत क्षेत्र जिरायत दाखवण्यासाठी विहीर बुजवून तर पाईपलाईन काढुन टाकली. त्यांना बागाईत क्षेत्र पडीत करण्यास भाग पाडले.

दरम्यान, या मध्ये गैरअर्जदार ढोले यांनी तलाठी व सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून  बागायत क्षेत्राचे जिरायत क्षेत्र करून घेतले. त्यामुळे, राष्ट्रीय महामार्ग 9 मध्ये संपादित झालेल्या जमिनीची नुकसान भरपाईची रक्कम खोटे बोलुन संमतीपत्रावर सह्या करून 45 लाख रुपये हडप केले आहे. तसेच तक्रादार यांचा पुतण्या गोरख सुर्यवंशी यांनी जमीन विक्री करून तक्रादार यांना पैसे दिले नाहीत. तरी देखील तक्रारदार यांच्या हीश्याचे क्षेत्र सातबाऱ्याववरून नाव कमी करून स्वतःच्या नावावर केले आहे. या क्षेत्रावर आदिवासी जमिनीचे निर्बंध घातले असल्याने अभिजीत ढोले यांना ही परवानगी आणण्यास विलंब झाल्यामुळे तक्रादार यांनी 8 जानेवारी 2021 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवुन हा व्यवहार रद्द केला होता. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे 9 फेब्रुवारी 2022 रोजी ही जमीन विक्रीस परवानगी देऊ नये असा हरकत अर्ज देखील केला होता. तरी सुर्यवंशी कुटुंबाच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन फसवणूक करून खरेदी दस्त नोंदवून घेतला. तक्रारदार सीताबाई सुर्यवंशी व योगेश सुर्यवंशी यांची फसवणूक लक्षात येताच ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी जात असताना राजु खरात व प्रवीण गायकवाड हे दमदाटी करून गैरअर्जदार अभिजीत ढोले यांच्या ऑफीसवर नेऊन सत्यम वारे व अभिजीत ढोले यांनी दमदाटी, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, आदिवासी कुटुंबातील सीताबाई सुर्यवंशी व योगेश सुर्यवंशी हे जिवाच्या भीतीपोटी कोठेही तक्रार केली नाही.

दरम्यान, दि.11 नोव्हेंबर 2022 रोजी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी रेकॉर्डला कोणतीही नोंद घेऊ नये अशी हरकत घेतली होती. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही सुनावणी झाली नाही. त्यानंतर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात दोन दावे दाखल असताना जमिनीचा व्यवहार करण्यात आला. हा सर्व प्रकार आयोगापुढे मांडण्यात आला.   त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्रांत अरुण उंडे हे सुनावणीला उपस्थित होते. त्यांना या प्रकरणात विचारणा केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे, सीताबाई सुर्यवंशी व योगेश सुर्यवंशी यांच्या मालकी हक्कात आदिवासी खातेदारकडुन बिगर आदिवासी यांच्यात खरेदी दस्त करताना अट क्र.11व 12 या नियमाची पायमल्ली केली असल्याचे आयोगाचे निदर्शनास आले. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करावा असे स्पष्ट आदेश अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे दिला आहे. आता हा आदिवासी जमिनीचा उतारा मैथिली सत्यजीत तांबे यांच्या नावावर देखील असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

आदिवासी जमीन बळकवणाऱ्यांचा “आका” शोधा.!

ढोलेवाडी येथे आदिवासी कुटुंबातील सदस्यांना धमकावून, गाड्या जाळून, मारहाण करून दांडकशाहीचा प्रयत्न करत असेल तर ही बीडच्या संस्कृतीकडे संगमनेरची वाटचाल सुरू झाली आहे. ज्या नेत्यांनी विश्वासाने पदे दिली ती गुंडगिरी करून कोठ्यावधीचा भूखंड स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असेल तर हे दुर्देव आहे. ढोलेवाडी येथे गुंठ्याला लाखोंचा भाव आहे. येथे स्क्वेरफुटाला सुद्धा किंमत आहे. त्यामुळे, रोडलगत असणारी अशी 300 गुंठे जमीन जर लाटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर या पाठीमागे मोठा “आक्का” असल्याची चर्चा होत आहे. कारण, जेव्हा हा व्यवहार करण्यात आला तेव्हा महसुलमंत्री पद कोणाकडे होते. हे सर्वसृत आहे. त्यामुळे, आदिवासी समाजाची जमीन काही कार्यकर्ते दमदाटी करून बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर येथे आदिवासी समाजाचे जन आंदोलन उभारल्याशिवाय आदिवासी बांधव शांत बसणार नाही अशी टीका आता आदिवासी नेत्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here