संगमनेर : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागावर असली, तरी प्रत्यक्षात पोलिसच मैदानात उतरले आहेत. महसूल अधिकारी डोळेझाक करून फक्त नदीपात्रात फेर्या मारण्यात व्यस्त आहेत. मात्र शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाळू माफियांना मोठा झटका बसला असून, तब्बल तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हेवाडी रोड भागात मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांनी पथकासह सापळा रचला. रात्री साडेएकच्या सुमारास विना नंबर प्लेटची महिंद्रा झेनॉन गाडी दिसताच पोलिसांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली. वाहनातील चालक ज्ञानेश्वर सुरेश लोटे (रा. साईनगर) याने चौकशीत वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले.
पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद असली तरी महसूल विभागाचे मौन आणि निष्क्रियता यावर लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाळू उत्खनन थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, तेच अधिकारी नदीपात्रालगत केवळ ‘फेऱ्या’ मारण्यात व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महसूल विभागाच्या या दुर्लक्षामुळे शासनाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असून पर्यावरणीय हानीही गंभीर स्वरूप धारण करत आहे. नदीपात्रातील वाळू उपसावर नियंत्रण नसल्याने नैसर्गिक प्रवाह बिघडत असून, बेकायदेशीर वाळू वाहतूक पुन्हा वाढू लागली आहे.
दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल शरद पोकळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी लोटेवर बी.एन.एस. कलम ३०३ आणि २ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पारधी पुढील तपास करीत आहेत.








