साकूर गटात उमेदवारांची झोप उडाली! आरक्षणाच्या प्रतीक्षेत इच्छुकांची धाकधूक वाढली

0
24

संगमनेर : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साकूर जिल्हा परिषद गटासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी केली आहे. मात्र सर्व इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. इच्छुक उमेदवार आरक्षण सोडतीनंतर आणखी जोर लावणार आहेत. तर आरक्षणामुळे अनेकांची निराशा होणार आहे.

यंदापासून नव्याने 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत काढण्यात येणारे जिल्हा परिषदेसाठी पहिले आरक्षण काढण्यात येणार आहे. यंदा नव्याने निघाणार्‍या आरक्षणामुळे आपला गट आरक्षीत होणार की खुला राहणार याच्या धास्तीने अनेक इच्छुकांना धडकी भरली आहे. तर काहीच्या पोटात गोळा आला आहे.

जिल्ह्यात 2017 ला शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या आहेत. आता 2025 सुरू असून गेल्या आठ वर्षापासून ग्रामपंचायत वगळता जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणूका झालेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात विधानसभेच्या दोनवेळा निवडणूका झालेल्या असून यामुळे गाव पातळीवरील दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील नेतृत्व राज्यव्यसपिठ उपलब्ध नसल्याने नाराज दिसत आहेत.

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटात काय आरक्षण लागेल अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीवेळी या गटात महिला आरक्षण होते. त्यामुळे आता पुन्हा नवीन आरक्षण काय लागेल अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, 2002 ला सुरू झालेल्या आणि पुढील 25 वर्षे चक्रीय पध्दतीने सुरू राहणार असलेल्या राजकीय आरक्षणाला यंदा छेद बसणार आहे. या वर्षीपासून नव्याने नव्याने 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत निवडणुकीचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने अनेक ठिकाणी आरक्षण बदलण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here