संगमनेर : शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. शुक्रवारी (दि.३) सकाळी दहा वाजता दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल साडेतीनशे किलो गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पथकाने भारतनगर भागातील कत्तलखान्यावर धाड टाकली. या ठिकाणी शाहिद गणी कुरेशी (वय ४०, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याकडून अंदाजे दीडशे किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या गोमांसाची किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल सालबंदे यांच्या फिर्यादीवरून शाहिद कुरेशी याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच मोहिमेत पोलिसांनी कादरी मस्जिद परिसरात दुसरा छापा टाकला. येथे मोहम्मद नईम अब्दुल अलीम कुरेशी (वय ३९, रा. मोगलपुरा, संगमनेर) याच्याकडून दोनशे किलो गोमांस आणि एक सुरा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे.
या संदर्भात पोलीस नाईक बापूसाहेब हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कुरेशी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
लक्षवेधी बाब म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर वेळोवेळी कारवाई होत असली तरी त्याला पूर्णविराम लागत नाही. यामुळे अशा ठिकाणांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.








