संगमनेर तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; १५ दिवसांत दुसऱ्यांदा धक्के बसल्याने नागरिक भयभीत

0
30

संगमनेर : तालुक्यातील बोटा आणि घारगाव परिसरात सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अकलापूर भागात या हादऱ्यामुळे घरातील भांडी खाली पडली. अचानक आवाज ऐकून घबरलेले ग्रामस्थ घराबाहेर रस्त्यावर धावून आले. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

यापूर्वी केवळ पंधराच दिवसांपूर्वी या भागात भूकंपाची नोंद झाली होती. त्या वेळी नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापन यंत्रावर २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का नोंदवण्यात आला होता, अशी माहिती भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली होती. सोमवारी झालेल्या धक्क्यांदरम्यान अकलापूर येथे दुपारी १२ वाजता मोठा आवाज झाला आणि हादऱ्यामुळे घरातील भांडी खाली कोसळल्याचे स्थानिक सचिन तळेकर यांनी सांगितले.

यापूर्वीही संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव, बोटा, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे आणि अकलापूर या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्या सर्वांची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेत करण्यात आली आहे.

सौम्य धक्के असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मात्र, वारंवार होणारे धक्के ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन भूकंपाचे कारण आणि तीव्रतेचा तातडीने तपास करावा, अशी मागणी बोटा येथील माजी सरपंच विकास शेळके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here