संगमनेरात प्रसादाच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक; अनोळखी तरुणांनी केल्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास

0
35

संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय वृद्धाची प्रसाद देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी घडली. हातचलाखी करून अनोळखी दोन तरुणांनी वृद्धाकडील तब्बल ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे, ता. संगमनेर) हे २३ सप्टेंबर रोजी दुपारी मोटारसायकलवरून जोर्वे येथे परतत होते. चंदनापुरी घाटाखालील ढगाडी मंदिराजवळ त्यांना दोन अनोळखी तरुणांनी थांबवले. ‘हा प्रसाद देवाला द्या’ असे सांगत आरोपींनी त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या मागितल्या. दिघे यांनी विश्वास ठेवून अंगठ्या दिल्यानंतर आरोपींनी हातचलाखीने त्या स्वतःकडे ठेवून कागदी पुडीत दगड बांधून परत दिल्या.

काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिघे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटोळे तपास करीत आहेत.
या घटनेतील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here