संगमनेर : तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत आजी आणि नातवाचा गरम पाण्याने होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
खळी कांगणवाडी येथील सिंधुबाई नामदेव सोसे (वय ५२) व त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय ५) यांच्यावर ८ सप्टेंबर रोजी पहाटे अंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अपघाताने अंगावर सांडले. यात दोघेही जवळपास ६० टक्के भाजले. त्यांना तत्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १५ सप्टेंबर रोजी सिंधुबाईंचा मृत्यू झाला, तर दीर्घ झुंजीनंतर २३ सप्टेंबर रोजी नातू राहुलचाही मृत्यू झाला.
एका कुटुंबातील दोन सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिंधुबाई यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, मुलगे प्रकाश व योगेश, दोन सुना, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. तर लहानगा राहुल आपल्या आई-वडील व लहान बहिणीसह कुटुंबाला कायमचा पोरकं करून गेला.
साधे, कष्टकरी व मनमिळाऊ स्वभावामुळे सोसे कुटुंब गावात परिचित होते. या कठीण प्रसंगी खळी कांगणवाडीतील ग्रामस्थांनी कुटुंबाला धीर देत माणुसकीचे उदाहरण घालून दिले.








