कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम
अहिल्यानगर जिल्ह्यात : ४ फेब्रुवारीपासून जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जनजागृतीसह बाधित व संशयित रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जात असून, महिनाभरात आतापर्यंत ३७ जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे.
देशात असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून, जवळपास ६३ टक्के मृत्यू या रोगांमुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९ टक्के इतके आहे. मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग या तीन कर्करोगांचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ३० वर्षांवरील लोकांची मौखिक, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी केली जात आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी मनपा यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे.
जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी राजस्तरीय अभियानाचा आरंभ झाला आहे. निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक उपचार विनामूल्य मिळण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत आढळलेल्या रुग्णांना कर्करोग उपचार केंद्रावर पाठविण्यात येऊन विनामूल्य उपचार दिले जात आहेत.








