संगमनेरच्या वडगाव लांडगा येथे चार्‍यातून आठ गाईंना विषबाधा; नीलम खताळांकडून नुकसानग्रस्त शेतकरी लांडगे कुटुंबाची भेट

0
81

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गाईना चाऱ्यातून विषबाधा झाली आहे. वेळीच उपचार सुरू केल्याने सहा गाईचे प्राण वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मात्र, दुर्दैवाने दोन गाईंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लांडगे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी लांडगे यांच्या घरी तातडीने भेट देऊन शासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

वडगाव लांडगा येथील तुकाराम लांडगे यांनी आपल्या गाईंना चारा दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच गाई अस्वस्थ होऊ लागल्याचे लक्षात आले. गाईंची प्रकृती अचानक बिघडत असल्याचे दिसताच लांडगे कुटुंबीयांनी तातडीने वडगाव लांडग्यातील स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांना माहिती दिली. डॉ. जाधव यांनी तातडीने धांदरफळ बुद्रुक येथील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. सचिन वर्षे व डॉ. राजाराम भांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी गाईंची तपासणी करून आवश्यक उपचार तातडीने सुरू केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आठपैकी सहा गाईचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, दोन गाईचा मृत्यू झाला. सध्या दोन गाईवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला, तसेच शासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

सध्याच्या पावसाळी वातावरणात गाईंनी कोवळे गवत खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. त्यामुळे दोन गाई दगावल्या असून, आणखी दोन गाईवर उपचार सुरू आहेत. इतर गाईंची प्रकृती सध्या स्थिर आहे. वेळेवर उपचार सुरू केल्यामुळे इतर गाईचे प्राण वाचवता आले. – डॉ. पुंडलिक येवले, पशुवैद्यकीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here