संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी येथे पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी व मुलबाळ नसल्याच्या कारणावरून सातत्याने होणारी मारहाण, शिवीगाळ व मानसिक छळाला कंटाळून प्रगती अविनाश पवार या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांना अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रगतीचे लग्न २२ जून २०१८ रोजी चंदनापुरी येथील अविनाश उत्तम पवार याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाले होते. सुरुवातीला चार-पाच महिने प्रगतीला चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर तिला माहेराहून दहा लाख रुपये हुंडा आणण्याचा दबाव टाकण्यात येऊ लागला. प्रगतीने ही बाब आई-वडिलांना सांगितली, परंतु मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते पैसे देऊ शकले नाहीत.
यामुळे प्रगतीला वारंवार शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ सहन करावा लागत होता. तसेच अपत्य होत नसल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवून तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. अखेर या छळाला कंटाळून रविवारी रात्री प्रगतीने घरातील बेडरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवले.
या घटनेनंतर प्रगतीच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली. फिर्यादीनुसार पती अविनाश उत्तम पवार, सासरे उत्तम काशिनाथ पवार, सासू वत्सला उत्तम पवार (चंदनापुरी), नणंद कविता रवींद्र देवकर व नंदाई रवींद्र लक्ष्मण देवकर (शिंदोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे करत आहेत.








