चाळीस वर्षांची सत्ता उलथवणारी संगमनेरची जनताच खरी ‘जायंट किलर’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
32

संगमनेर : संगमनेरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हे भगवं वादळ पाहायला मिळालं. कारण, विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला आणि चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळेच तुमच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आलोय. अमोल खताळ जरी जायंट किलर ठरला, पण खरे जायंट किलर जनता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महायुतीचा महाविजय सभा आणि आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 24) त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी झालेल्या जल्लोषमय रॅलीत ठिकठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर जाणता राजा मैदानावरील सभेला हजारोंचा जनसागर लोटला होता.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रत्यक्ष नाव न घेता कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. हे स्वागत, प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. कुणालाही येथे भाड्याने आणलेलं नाही, सर्वजण प्रेमापोटी आले आहेत. खर्‍याअर्थाने येथे लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी यांचा संगम पाहायला मिळाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आमदार अमोल खताळला खबर्‍या म्हणणार्‍यांच्या हातात आपण खुळखुळा दिला आहे. त्यांनी तो वाजवावा, नवीन आमदार कामाच्या माध्यमातून सगळ्यांची खबर बनेल. या निकालामुळे संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहित पडला. निराधारांना आधार देण्याचं काम केलं म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार म्हणजे अमोल खताळ अशी ओळख तयार झाली.

लोकसभेला फेक नरेटिव्ह पसरवून यश मिळवलं. मात्र विधानसभेत लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलं. या योजनेत खोडा घालणार्‍यांना जोडा दाखवा म्हटल्यावर बहिणींनी 232 नंबरचा जोडाच त्यांना मारला. तेव्हा विरोधक काहीही म्हणाले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आमचं सरकार दिलेला शब्द पाळणारं आहे. असे मुद्दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here