संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त तीगाव परिसरातील १८ गावांमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी पोहोचले. या पार्श्वभूमीवर जलपूजनासाठी पोहचलेल्या जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा चांगलाच समाचार घेतला. ४० वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या. अशी टीका जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी केली.
जलपूजनाच्या कार्यक्रमावेळी बोलताना जलसंपदामंत्री विखे पाटील म्हणाले, आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने झालेला बदल संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे. चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होती. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते. मात्र याचा जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. आम्ही लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. पाणी आम्हीच आणले आणि कॅनॉल आम्हीच पूर्ण करणार. अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
तसेच, पूर्वी संगमनेर मतदारसंघात केवळ क्रेशर व वाळूवाले फिरायचे जलसंपदा खाते माझ्याकडेच असल्याने तुम्ही आता चिंता करू नका, कारण मी जे बोलतो ते करतो. अमोल खताळ नवीन आमदार असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यांनी ४० वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या. संगमनेर मतदार संघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरत आहे, लोकांना भेटत आहेत. पूर्वी संगमनेरमध्ये फक्त क्रेशर वाले आणि वाळू वाले फिरायचे. ठेकेदारांनी गावं वाटून घेतली होती. त्यामुळे आपण आता लोकांमध्ये राहणारा आमदार दिला.
दरम्यान, दुष्काळग्रस्त परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पोहोचल्याने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांची बैलगाडीतून मिरवणुक काढून भव्य पुष्पहार घालून नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.








