पावसाने यंदा जिल्ह्यात धुव्वाधार सुरूवात केली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारली आहे. यामुळे खरीप हंगामात 6 लाख 75 हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांवर संकट ओढवलेले आहे. पावसाअभावी संगमनेर आणि अकोले तालुक्यात पिकांवर मावा व तुडतुडे या किडीचा प्रार्दुभाव असून मका पिकावर लष्कारी अळीने हल्ला चढवला आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या महिनाभरात अत्यंत तुरळक पाऊस पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांचा जोम कमी झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके तहानाली आहे.
तसेच ज्या ठिकाणी पाण्याची सोय असल्याने पिके जोमात आहेत, त्या ठिकाणी विविध पिकांवर कीड रोगाने हल्ला चढवला आहे. यामुळे शेतकरी असमानी संकटामुळे हबकल्याचे चित्र आहे. पिकांचे नुकसान होत असताना आधीच पाण्याच्या व्यवस्थापनात गुंतलेल्या बळीराज समोरील अडचणी वाढतांना दिसत आहेत. यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याचे प्राथमिक चित्र असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
प्रामुख्याने जनावरांचा चारा म्हणून मका पिकाची लागवड शेतकरी करत असतात. परंतु या मका पिकावर अकोले व संगमनेर तालुक्यात लष्करी अळीचा मोठा प्रार्दुभाव झाला आहे. तसेच राहाता तालुक्यात अनेक ठिकाणी मका पिकांवर तांबुसपणा दिसत आहे. यासह सोयाबीन पिकाचे क्षेत्र अधिक असणार्या तालुक्यात वेगवेगळ्या अळींनी पिकावर हल्ला चढवला आहे.








