संगमनेर : संगमनेर बस स्थानकात एक हृदयद्रावक घटना घडली. बसस्थानकात शनिवारी घडलेल्या अपघातात संगमनेर कॉलेजचे माजी लेखापाल संजय विनायक संभूस (वय ७२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर कुरुंदवाड आगाराच्या बसचा धक्का लागल्याने संभूस हे खाली पडले व बसचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांना गंभीर इजा झाली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने मेडिकवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू करताना शस्त्रक्रियाही केली, मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने रविवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मेडिकवर रुग्णालयातील डॉ. बोधे आणि डॉ. हासे यांनी उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांना यश आले नाही.
या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगार प्रशासनाच्या हलगर्जीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत.
संजय संभूस यांनी संगमनेर कॉलेजमध्ये तब्बल ३६ वर्षे लेखापाल म्हणून सेवा बजावली होती. त्यांचा स्वभाव शांत, मदतीस तत्पर आणि मैत्रीपूर्ण असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. विशेष म्हणजे, मृत्यू झाल्याचा दिवस ‘जागतिक मित्र दिवस’ असल्याने, ‘एक सच्चा मित्र हरपला’, अशी भावना नातेवाईक, सहकारी आणि मित्रपरिवारात व्यक्त होत आहे.








