संगमनेर : साकूर हे संगमनेर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव असुन या भागातील नागरिकांना अहिल्यानगर, पुणे व शिर्डी या भागात येण्या-जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नाही. अहिल्यानगर कडे जाणार्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो तर पुण्याकडे जाणार्या प्रवाशांना साकूर फाटा किंवा थेट घारगाव गाठावे लागते. लोणी,शिडी व कोपरगाव कडे जाण्यासाठी आश्वी मार्गे जवळचा रस्ता असतानाही बससेवा नसल्याने संगमनेर येथून जावे लागते.
साकुर पठारभागातील अनेक तरुण पुणे जिल्ह्यात नोकरी व्यवसाय करत असुन त्यांनाही येण्या जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नाही. या सर्व प्रवाशांच्या गैर सोयीची दखल घेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी या मागणीची दखल घेत आपल्या कार्यालयातुन संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे.
आमदार अमोल खताळ पा.यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संगमनेर आगाराला नुकत्याच 10 नवीन बसेस मिळाल्या आहेत. रऊफ शेख यांनी निवेदनाद्वारे संगमनेर ते साकूर – टाकळी ढोकेश्वर मार्गे अहिल्यानगर ही बस सुरु करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर पुणे ते साकूर/मांडवे ही आळेफाटा/घारगाव मार्गे तर कोपरगाव ते साकूर ही शिर्डी/लोणी/आश्वी या मार्गे साकूर मुक्कामी बस सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार अमोल खताळ यांनी या मागणीची दखल घेत आपल्या कार्यालयातुन संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. रऊफ शेख यांनी या मागणीकडे आमदारांचे लक्ष वेधल्याने साकुर पठारभागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.








