संगमनेरमध्ये प्रहार जनशक्तीचे चक्काजाम आंदोलन, महामार्गावर पत्त्यांचा डाव मांडत कृषीमंत्र्यांवर टीका

0
37

संगमनेर :  प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, शेतमालाला हमीभाव मिळावा, विधवा तसेच दिव्यांग बांधवांना मासिक ६,००० रुपये मिळावेत या प्रमुख मागण्यांसाठी २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाला शिवप्रतिष्ठाननेही सक्रिय पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

संगमनेर बसस्थानकासमोरील पुणे-नाशिक हायवेवर शिवप्रतिष्ठानतर्फे चक्काजाम करण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हायवेच्या मध्यभागीच पत्त्यांचा खेळ खेळत सरकारच्या कृषी धोरणांवर लक्ष केंद्रीत केले. यावेळी शेतकरी व दिव्यांग बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिवश्री राहुल ढेंबरे पाटील आणि दिव्यांग सारथी संघटनेचे विनायक दाभोळकर यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि प्रशासनाला निवेदन सादर केले.

या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाने तात्काळ मागण्यांवर कार्यवाही करावी,  शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला अधिक तीव्र स्वरूप देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here