लाच घेतली पण काम केले नाही, संगमनेरातील पोलीस अधिकाऱ्यावर फसवणुकीचा ठपका

0
64

संगमनेर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर लाच मागणी व फसवणुकीचे आरोप झाले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धनंजय महाले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

१९ जानेवारी २०२३ रोजी अमर कतारी यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या एका प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर धनंजय महाले यांनी संबंधित प्रकरणात कारवाई करण्यासाठी कतारी यांच्याकडून कागदपत्रांच्या खर्चासाठी व कायदेशीर प्रक्रियेसाठी एकूण ४० हजार रुपयांची मागणी केली. कतारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुरुवातीला २० हजार रुपये रोख दिले, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले.

यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी संगमनेरमधील एका हॉटेलजवळ महाले यांनी आणखी दहा हजार रुपये घेतले. त्यामुळे कतारी यांनी एकूण ३० हजार रुपये दिले असतानाही त्यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट वारंवार विचारणा केल्यावर महाले यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप कतारी यांनी केला आहे.

६ जून २०२४ रोजी कतारी यांनी पुन्हा कारवाईबाबत विचारणा केली असता, महाले यांनी त्यांना पोलीस स्टेशनबाहेर बोलावून धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, कतारी यांनी तक्रारीसोबत व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट, तसेच फोन कॉल संदर्भातील काही पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील अधिकऱ्यांच्या सततच्या लाचखोरीच्या प्रकरणांमुळे पोलीस दलातील शिस्त व जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची तात्काळ व पारदर्शक चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमर कतारी यांच्यासह नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here