वीरजवान संदीप घोडेकर यांच्या स्मृती जपण्यासाठी संगमनेरमध्ये स्मारक उभारण्याची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

0
173

संगमनेर तालुक्यातील वीरजवान मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे अशी मागणी करण्यासाठी संगमनेर महायुतीचे पदाधिकारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची भेट घेणार आहेत.

तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर हे दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांची देशाप्रती असलेली कर्तव्य, निष्ठा भविष्यात संगमनेर तालुक्यातील नागरिकांना कायम देशसेवेसाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी असणार आहे. त्यासाठी वीरजवान संदीप घोडेकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आपली जन्मभूमी, कर्मभूमी आणि देशासाठी प्रामाणिक राहून आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी वचनबद्ध असल्याची भावना मेजर संदीप घोडेकर सातत्याने बोलून दाखवत असे. मेजर संदीप घोडेकर यांचे उदात्त विचार आणि कार्याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे. दरम्यान, स्मारक उभारणीसाठी महायुतीच्या वतीने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजपा शहराध्यक्षा पायल ताजणे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे अजीत जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

वीरजवान मेजर संदीप घोडेकर यांचे स्मारकासाठी महायुतीचे पदाधिकारी लवकरच जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here