संगमनेर : “सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ” या उत्पादनात भेसळ झाल्याचे पुणे येथील कियान लॅबच्या अहवालातून उघडकीस आले आहे. या अहवालानुसार गुळाच्या तपासणीत गंभीर तफावत आढळून आली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार त्याला मानांकन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या अहवालानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
घुलेवाडी येथील शंकर रावसाहेब ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा स्टोअरमधून खरेदी केलेला गूळ खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास झाला. यापूर्वीही २२ एप्रिल रोजी त्यांनी अशाच लक्षणांचा अनुभव घेतला होता. त्यानंतर त्यांनी २८ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.
पुण्यातील कियान लॅबने ४ जुलै रोजी नमुना तपासणी अहवालात गुळात भेसळ असल्याचे निष्कर्ष नोंदवले. त्यानुसार, गूळ उत्पादनाच्या प्रक्रियेत निकृष्ट पदार्थांचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शंकर ढमाले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी २७ मे, १७ जून आणि २६ जून रोजी पाठवलेल्या पत्रांमध्ये कारवाईची मागणी केली होती. मात्र, अन्न व औषध विभागाने “सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ” कंपनीवर कारवाई करण्याऐवजी सागर प्रोव्हिजन स्टोअरवर छापा टाकून मूळ दोषींना वाचवल्याचा आरोप त्यांनी केला.
ढमाले यांनी मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्यावर केवळ गुळातच नव्हे, तर इतर अनेक किराणा मालातही भेसळीचे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये जनावरांना दिली जाणारी खराब गुळपावडर, ब्रँडेड तांदळात रेशनचा तांदूळ, स्थानिक बेसन पिठाचा ब्रँडेड लेबलखाली विक्री, तसेच डाळी व कडधान्यांना कृत्रिम रंग-गंध मिसळण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारांबाबत त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार चौकशीची मागणी करत अर्ज केला असून, अद्याप त्यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. प्रशासनाने जर सात दिवसांत कारवाई केली नाही, तर १५ ऑगस्ट २०२५ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा शंकर ढमाले यांनी दिला आहे. त्यांना भविष्यात काही शारीरिक इजा झाल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.








