संगमनेरच्या ब्रिटिशकालीन पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईवरही वेधले लक्ष

0
46

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटीशकालीन पूल आजही वापरात आहे. या पुलासह राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार खताळ यांनी हा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. तसेच संगमनेरातील रखडलेल्या कामांबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून किती दिवसांमध्ये पुनर्बांधणी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारी रस्त्यांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. शासन निधी खर्च करायला तयार आहे पण, त्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे ती कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, ही बाब लक्षात घेता वेळेमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी लक्षवेधी सूचना आमदार खताळ यांनी मांडली.

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन ते चार पर्यटकांचा बळी गेला तर काही जण जखमी झाले. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली नाही याकडे विधिमंडळाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या दुर्घटनेबाबत एक समिती स्थापन केलेली आहे, त्या समितीचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे विधानभवनात सांगितले.

आमदार अमोल खताळ हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी सातत्याने झटत आहेत. स्थानिक नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षांवर ते वेळोवेळी लक्ष केंद्रीत करत असून, त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केवळ मतदारसंघापुरते मर्यादित न राहता, राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्नही त्यांनी विधानसभेत मांडले आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची कमतरता, जुने पूल आणि त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज, तसेच स्थानिक पातळीवरील विकासकामे यावर त्यांनी ठोसपणे आवाज उठवला आहे. त्यांच्या लक्षवेधी सूचना आणि चर्चेमधून त्यांनी नेमकेपणाने मुद्दे मांडले असून, शासनाचा आणि संबंधित विभागांचा या विषयांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले आहे. संगमनेरच्या विकासाची नाळ हेरून, आपल्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, त्यांच्याकडून पुढील काळातही अशीच भक्कम भूमिका अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here