संगमनेर : खरीप हंगामासाठी संगमनेर तालुक्यात सरकारने मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा पुरवठा केला आहे. मात्र काही भागात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी तातडीने कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन युरियाची उपलब्धता सुनिश्चित करून खतापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार अमोल खताळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, तालुक्यात युरियाचा पुरेसा साठा असूनही जर कोणत्याही कृषि सेवा केंद्र किंवा सहकारी संस्थांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल, तर अशांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांना युरिया मिळण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, याची जबाबदारी कृषी विभागाने घ्यावी.
तालुक्याला ४११ मेट्रिक टन युरियाचा पुरवठा
संगमनेर तालुक्याला आतापर्यंत ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले असून, त्यापैकी २०५ मेट्रिक टन युरियाचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित युरियाचे त्वरित वितरण करण्याचे आदेश संबंधित कृषि सेवा केंद्र आणि सहकारी संस्थांना देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका
तालुक्यात युरिया टंचाई बाबत काही ठिकाणी विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, युरियाचा पुरवठा नियमितपणे होत आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठेही अडवणूक होत असल्यास थेट जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांना युरिया खत सहज उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कृषी सेवा केंद्र चालक आणि सहकारी संस्था यांना युरियाचा योग्य प्रकारे वितरण करणे बंधनकारक असून, शेतकऱ्यांच्या हक्कावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
युरिया उपलब्धतेसंदर्भात तांत्रिक किंवा इतर कोणत्याही अडचणी आल्यास, त्यावर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचेही निर्देश आमदार अमोल खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुलभ शेतीसाठी प्रशासन सतर्क असून, कोणतीही गैरप्रकाराची घटना खपवून घेतली जाणार नाही, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले.








