संगमनेर : तालुक्यातील आदिवासीबहुल मांडवे बुद्रुक परिसरातील चहानपटा वस्ती ही गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेषतः या वस्तीपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना कायम अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे अशक्य बनते. त्यासाठी चहानपटा येथील सीडीवर पूल गरजेचा आहे.
स्थानिक नागरिक आणि आदिवासी वस्तीसाठी महत्वाचा ठरणारा हा पुल दीर्घकाळ प्रलंबित आहे. मात्र आता या पुलाच्या कामाला गती मिळणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम लवकरच मार्गी लागणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष गुलाब राजे भोसले आणि ऍड. अमित धुळगंड यांनी दिली आहे.
गुलाब राजे भोसले यांनी सांगितले की, “संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ झाल्यापासून तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यांनी जनतेच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करत प्रभावीपणे पाठपुरावा केला आहे. चहानपट्टा वस्तीतील पुलाचे काम मंजूर करून लवकरच प्रत्यक्षात सुरू केले जाईल.”
या भागातील आदिवासी नागरिकांना दररोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे अनेक सामाजिक व आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुलांपासून ते रुग्णवाहिकेसाठीही मार्ग नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. आता हा पूल झाल्यास नागरिकांना मूलभूत संपर्क सुविधा मिळून त्यांच्या जीवनमानात बदल घडेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
यावेळी चहानपटा वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आमदार अमोल खताळ, मंत्री विखे पाटील, गुलाब राजे भोसले आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. “आमच्यासाठी हे केवळ पूल नव्हे, तर जीवन रक्षक दुवा ठरणार आहे,” असे शब्द एका आदिवासी महिला प्रतिनिधीने सांगितले. हा पूल लवकरात लवकर पूर्ण करून मांडवे बुद्रुक आणि चहानपटा वस्तीमधील नागरिकांना दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.








