सत्तासंघर्ष! संगमनेरात विकासाची गंगा वाहणार की, श्रेयवादच रंगणार?

0
111

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ऐतिहासिक म्हणावा असा राजकीय बदल झाला, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला छेद देत महायुतीने येथील सत्ता काबीज केली आणि नवीन राजकीय सत्तासमीकरण आणि सत्तासंघर्ष या मतदारसंघात सुरू झाला.

सुमारे ४० वर्ष संगमनेरचे लोकप्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला. सामाजिक, राजकीय चळवळीतून उभे राहिलेले तरुण नेतृत्व अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेरला नवीन लोकप्रतिनिधी मिळाले. जॉयंट किलर म्हणून अमोल खताळ यांचे प्रचंड स्वागत आणि कौतुक झाले. त्याच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये, नवीन मतदारांमध्ये व परिवर्तनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच उत्साह संचारला. आमदार खताळ यांनी देखील पहिल्या दिवसापासून धडाकेबाज कामाला सुरुवात केली. सातत्याने जनसंपर्क, अल्पावधीतच उभारलेले जनसंपर्क कार्यालय व त्याद्वारे जनतेची होत असलेली कामे यामुळे शहर व तालुक्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार असे वाटत असताना संगमनेर मतदारसंघात श्रेयवाद कुरघोडी आणि द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे.

लोकप्रतिनिधी व मंत्री पदाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात याआधी विकास कामे केली. निवडणुकीच्या आधी त्यांच्या निधीतून व प्रयत्नातून काही कामे सुरू होती तर काही कामे सुरू होणार होती. दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून जे कामे सुरू आहेत त्यांना गती देऊन ती लवकर मार्गी लावण्यासाठी आमदार अमोल खताळ प्रयत्नशील असताना दिसत आहे. तर जी कामे सुरू झाली नाही ती सुरू केली जात आहे. मात्र हे करत असताना काही कार्यकत्यांकडून श्रेयवादाचे नाटक रंगवले जात आहे.

आमदार खाताळ एखाद्या कामाची पाहणी करत असताना या कामाचा तुमच्याशी काय संबंध असे बोलून श्रेयवादाचे राजकारण केले जात आहे. तर त्याला सत्ताधाऱ्यांकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. विरोधी पक्ष म्हणून विरोधक विविध विषयांवर आंदोलन करत आहेत तर सत्ताधारी त्याची खिल्ली उडवत आहेत. अनेक कार्यक्रमात नागरीकांना राजकीय तमाशा पहावा लागत आहे. शहराच्या विकासासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होऊन शहराचा विकास झपाट्याने व्हावा ही सुज्ञ नागरीकांची मानणी आहे. परंतु श्रेयवादाचे राजकारण थांबल्याशिवाय हे शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here