राजापूर ते शिर्डी पायी दिंडीला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्वागत व महाआरती

0
377

संगमनेर : तालुक्यातील राजापूर येथील साईबाबा मंदिराच्या दीर्घकालीन परंपरेनुसार यंदाही पायी दिंडी मोठ्या भक्तिभावाने शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे. ही पायी दिंडी प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघते आणि यंदाही या पवित्र यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजापूर येथून सुरू झालेली ही पायी दिंडी समनापूर चौफुली जवळ पोहचताच, स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील यांनी या दिंडीचे मनापासून स्वागत केले. यावेळी दिंडीतील भाविक आणि उपस्थित साईभक्तांनी “साईराम”च्या जयघोषात परिसर भक्तिमय केला. आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत आणि राजापूर येथील साईभक्तांच्या हस्ते समनापूर चौफुली येथे महाआरती करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत भक्तिभाव व समाधान दिसत होते.

दिंडीतील शिस्त, एकोपा आणि श्रध्देचे वातावरण विशेष आहे. या पायी दिंडीमध्ये महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ साईभक्तांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित आमदार अमोल खताळ यांचा साईबाबा मंदिराचे बाबू सोनवणे यांनी विशेष सत्कार केला.

आमदार खताळ यांनी साईभक्तांना शुभेच्छा देत, “समाजाच्या एकतेसाठी, भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या या पायी दिंडीचे महत्व अत्यंत मोलाचे आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण निरोगी, सुखी आणि एकत्र राहू या,” असे आवाहन केले.

या पायी दिंडीचा पुढील मार्ग वडगाव पान, निळवंडे, जांभूळवाडी फाटा मार्गे शिर्डीकडे निश्चित करण्यात आला. मार्गातील विविध गावांमध्ये दिंडीचे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या वेळी गहीनाथ हासे, ज्ञानदेव हासे, भाऊराव देशमुख, बाबू सोनवणे, नानासाहेब हासे, भास्कर हासे, संदेश देशमुख, ऋषी हासे, जिजाबा हासे, राजाराम हासे यांच्यासह राजापूर गावातील असंख्य साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या पायी दिंडीमुळे परिसरात एक वेगळाच आध्यात्मिक उत्साह निर्माण झाला असून, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेली ही श्रद्धेची व भक्तीची यात्रा प्रत्येकाला साईमार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here