आ. अमोल खताळ यांच्या सूचनेला प्रतिसाद; रियाज पिंजारी यांच्या कुटुंबीयांना नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

0
110

संगमनेर :  संगमनेर येथील गटार दुर्घटना प्रकरणातील मयत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना भरीव स्वरूपाची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली जाईल असे आमदार अमोल खताळ यांनी सांत्वनपर भेटीत सांगितले होते. यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सूचनेनंतर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी मृत रियाज पिंजारी यांच्या घरी जाऊन माणुसकीच्या भावनेतून कुटुंबीयांचे सांत्वन करत भरीव स्वरूपाची आर्थिक मदत कुटुंबीयांकडे सुपूर्त केली असल्याचे भाजप नेते व माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी सांगितले आहे.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ भूमिगत गटारीचे चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा चेंबरमध्येच गुदमरून  मृत्यू झाला होता. मात्र त्यास वाचविण्यास गेलेल्या रियाज जावेद पिंजारी याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या घटनेतील मृत अतुल पवार यांना नगरपरिषदेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. परंतु रियाज पिंजारी हा सुद्धा मित्राला वाचविण्यास गेला होता म्हणून त्यालाही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आ. अमोल खताळ यांच्याकडे पिंजारी यांच्या नातेवाईकांनी केली होती.

त्यानुसार माणुसकीच्या भावनेतुनपिंजारी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी चर्चा आ. अमोल खताळ आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यात झाली. यानंतर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पिंजारी कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेत माणुसकीच्या भावनेतून पिंजारी कुटुंबीयांना भरीव स्वरूपातील आर्थिक मदत केली. याबद्दल आ. अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देणार

संगमनेर येथील रियाज जावेद पिंजारी हा तरुण माणुसकीच्या भावनेतून अतुल पवार यास वाचविण्यात गेला होता. त्यामुळे पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या सभागृहात केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर विशेष बाब म्हणून पिंजारी  कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ हे आर्थिक मदत मिळून देतील असे ही माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here