रविवारी आ. अमोल खताळ यांच्यावतीने संगमनेर शहरात दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन

0
162

संगमनेर : जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.

हे शिबिर केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स यांचे मोजमाप घेऊन थेट साहित्य वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली.

शिबिराचे आयोजन गणेशनगर येथील नगरपालिकेच्या योगा भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी येताना आधारकार्ड, युडीआयडी कार्ड, रेशन कार्ड यांची सत्यप्रत व छायांकित प्रती सोबत आणाव्यात, तसेच दोन नातेवाईक सोबत असणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना मोफत सहाय्यक साहित्य वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त पात्र दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉ. दिपक अनाप आणि डॉ. अभिजीत मिरीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here