मैत्रेय व दूधगंगा घोटाळ्यातील गुंतवणूकदारांना परतावा मिळावा; आमदार अमोल खताळांची विधानसभेत मागणी

0
48

मुंबई : मैत्रेय कंपनीने गुंतवणुकीवर अधिक व्याज, दाम दुप्पट आदी अमिषे दाखवून अनेक नोकरदार, व्यावसायिक शिक्षक व सर्वसामान्य नागरिकांची आयुष्याची जमापुंजी ठेव म्हणून घेतली, मात्र काही दिवसातच या कंपनीने बिर्‍हाड गुंडाळत गुंतवणूकदारांना मोठा धोका दिला. याप्रकरणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदरांना लवकरात-लवकर परतावा मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील दूधगंगा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारांविरोधात सरकारकडे ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

विधानसभेत आज संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मैत्रेय कंपनी आणि दूधगंगा पतसंस्थेतील गुंतवणूकदारांच्या मुद्द्यावर सरकारला थेट प्रश्न विचारले. मैत्रेय कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र अजून अनेक गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळालेला नाही. गुंतवणूकदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी “सरकार गुंतवणूकदारांना परताव्याची हमी देणार का?” असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उपस्थित केला.

दूधगंगा पतसंस्थेचा गंभीर प्रश्न
संगमनेरमधील दूधगंगा पतसंस्थेचा ८१ कोटींचा घोटाळा देखील आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात मांडला. त्यांनी सांगितले की, “२००० ठेवीदारांचा पैसा अडकलेला असून त्यांना न्याय मिळत नाही. या प्रकरणातील संबंधित आरोपीची मालमत्ता विक्री करुन ठेवीदारांची आजपर्यंतच्या व्याजासह रक्कम देण्यात यावी. यासंदर्भात शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी विनंती आमदार खताळ यांनी विधानसभेत केली आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारांमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ठेवीदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर आणि प्रभावी पावले उचलावी, अशी ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेतून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here