प्रवरा नदीकाठच्या गावांना अलर्ट! निळवंडे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, नदीला पूर

0
41

संगमनेर : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसाने धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने भंडारदरा निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे भंडारदरा धरणातून सायंकाळी ५ वा ९७७४ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १३,२०३ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असल्याने प्रवरा नदीला पुर आलेला असुन नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापुर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली व ओझर बंधारा या भागातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये जनावरे, पंप, साहित्य, ट्रॅक्टर, अवजारे इत्यादी ठेवले असेल तर ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आंघोळीला किंवा पोहण्यासाठी जाऊ नये असेही आवाहन जलसंपदा विभागाबरोबरच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

दरम्यान अगस्ती पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here