पदवीधर आमदार सत्यजित तांबेंच्या संस्थेत शिक्षकाला भरतीसाठी मागितले 3 लाख; दोन कर्मचाऱ्यांना अटक

0
270

संगमनेर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होऊन देखील एका शिक्षकाकडे 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले, त्यातील 50 हजार रुपये स्विकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेत घडला आहे.

अभ्यास करुन भरती व्हायचं आणि पुन्हा यांना पैसे द्यायचे हे काही तक्रारदार यांना योग्य वाटत नव्हते. तक्रारदार हे यापुर्वी पुणे महानगरपालिकेत कार्यरत होते, त्यामुळे लाच घेणे आणि देणे हे त्यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर, शुक्रवार दि. 27 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या पथकाने संबंधित विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला आणि सह सेक्रेटरी बाबुराव राजाराम गवांदे (रा. मालदाड रोड, संगमनेर) व चंद्रभान काशिनाथ मुटकुळे (रा. चिकणी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशा दोघांना 50 हजार रुपये रोख घेताना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी शाळा सुटायच्या दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सायंकाळी चौकशी सुरु होती, यात बऱ्यापैकी राजकीय हस्तक्षेप होत होता, मात्र, रात्री उशिरा याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी नाशिक लाचलुचपत पथकाने केली.

दरम्यान, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज ही संस्था पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या अधिपत्याखाली आहे. असे असताना त्याच्याच घरच्या संस्थेत असा प्रकार घडतो, याला संस्थाचालक किती जबाबदार आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संस्थाचालकांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असेल का? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.

पदवीधर आमदाराचे मुळात कामच शिक्षण, नोकरी, प्रशासन, युवक, पदवीधर आणि शिक्षक यांच्या समस्या यावर अवलंबून आहे. तसेच शिक्षण व रोजगारासंबंधित कायदे, नियम व योजना यासाठी आवाज उठवणे. आपल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघातील विकासाच्या मागण्या मांडणे हे कर्तव्य पदवीधर आमदारचे आहे. मात्र याउलट स्थानिक पदवीधर आमदारांच्याच संस्थेत असे प्रकार घडल्याने याप्रकरणी कोण आवाज उठवणार हा मोठा प्रश्न आहे.

नेमकं घडल काय?
तक्रारदार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझी नियुक्ती पुणे महानगरपालिका शाळेत शिक्षक (शिक्षण सेवक) म्हणुन झाली होती, त्यानंतर दुस-या फेरीत माझी नियुक्ती संगमनेर शहरातील एका नामांकीत संस्थेत २० टक्के अनुदानित तत्वावर झाली. त्यानंतर मी संस्थेचे मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळविल्याने त्यांनी माझी शिक्षक पदासाठी नियुक्ती केली आणि तसे नियुक्तीपत्र देखील दिले होते. त्यावेळी मी माझे पुर्वीचे पदाचा रितसर राजीनामा देवुन दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक म्हणून संगमनेर येथे रूजू झालो होतो. दि. २४ जून २०२५ रोजी मी शालेय कामकाजामध्ये व्यस्त होतो. त्या दरम्यान दुपारी माझे मोबाईलवर संस्थेचे लेखनिक चंद्रभान मुटकुळे यांचे दोन मिसकॉल आलेले दिसले. म्हणुन मी त्यांना फोन केला आणि विचारले. की, सर तुम्ही कॉल केला होता का? तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला संस्थेचे सह सेक्रेटरी बाबुराव गवांदे यांनी संस्थेचे कार्यालयात भेटावयास बोलावले आहे असा निरोप दिला.

दरम्यान, पुढे फिर्यादीत म्हटले आहे. की, त्यानुसार मी काही वेळाने दुपारी अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास संस्था कार्यालयात गेलो आणि संस्थेचे सह सेक्रेटरी गवांदे यांना भेटलो. तेव्हा तेथे संस्थेचे लेखनिक मुटकुळे हे देखील उपस्थित होते. सह सेक्रेटरी गवांदे सर म्हणाले की, तुम्ही २० टक्के अनुदानित पदावर सह शिक्षक म्हणून काम करीत आहात. भविष्यात पुढील टप्पा अनुदान ४० टक्के, ६० टक्के याप्रमाणे १०० टक्के पर्यंत शासनाचे अनुदान वाढणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला भरपुर पगार मिळणार आहे, हे सगळे माझे हातात आहे. माझे शिवाय तुमचे कोणतेही काम होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जरी तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फत या संस्थेत पाठविले असले तरी देखील तुमचे सगळे भविष्य माझे हातात आहे. कारण तुम्ही शासनाकडुन नियुक्त झालेले असल्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढावयाचे असल्याने वेळ वाया न घालवता तुम्ही संस्थेला ३ लाख रूपये आणुन जमा करा.

गवांदे पुढे म्हणाले की, आम्ही इतर शासनाकडुन आलेल्या लोकांकडुनही ५ ते १० लाखापर्यंत पैसे जमा केलेले आहे. फक्त तुच असा एकटा आहे की, ज्याने आजपर्यंत एकही रूपया दिलेला नाही. त्यामुळे तुला भविष्यात सर्व काही सुरळीत चालु द्यायचे असेल व वेळेवर अनुदान घ्यायचे असेल येत्या तर २-३ दिवसात ३ लाख रूपये माझेकडे आणुन दे व याबाबत कोणालाही सांगू नको. दरम्यान, त्यावर संबंधित शिक्षक त्यांना म्हणाले की, माझी नियुक्ती परीक्षा देवुन शासनातर्फे झालेली आहे, त्यामुळे मी कशासाठी पैसे देवु, त्यावर त्यांनी सर्व संस्थांमध्ये असेच चालते व सर्व संस्थाचालक असे पैसे घेतात. तुझे भविष्यात होणा-या सर्व आर्थिक बाबी संस्थेच्या हातात आहेत. तुझे करीयरची ही सुरूवात आहे, जर तु पैसे आणुन दिले नाही तर, तुझे करीयर बरबाद करू शकतो एवढे माझेकडे अधिकार आहेत अशी धमकी त्यांनी दिली.

दरम्यान, संस्थेचे सह सेक्रेटरी बाबुराव गवांदे यांच्याकडे विनंती केली पण त्यांची काही मानसिकता झाली नाही. ते पैसे घेण्यावर ठाम होते.

त्यानंतर तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील 50 हजार रोख द्यायचे होते. याबाबत फिर्याद यांनी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानुसार हे पथक संगमनेर येथे दाखल झाले. त्यांनी सापळा रचला, संबंधित रक्कम घेऊन शिक्षक शुक्रवार दि. 27 जून 2025 दुपारी 4:00 वाजता घेवुन संस्थेच्या कार्यालयात गेलो तेथे पंचांच्या समक्ष संस्थेचे सह सेक्रेटरी बाबुराव गवांदे यांची भेट घेतली त्यावेळी मी त्यांना सांगितले मी 50 हजार रूपये आणले आहेत बाकीचे पैसे नंतर देतो, माझी नियुक्ती शासनातर्फे झालेली असतांना पैसे का घेतात असे विचारले असता त्यांनी संस्थेत प्रत्येक जण घेतो असे म्हणाले त्यानंतर मी 50 हजार रूपये लाचेची रक्कम देण्यासाठी पॅन्टचे खिशातुन काढुन त्यांचे समोर धरले असता त्यांनी प्रथम नोटांना हात लावला व लागलीच लेखनिक मुटकुळे यांना आवाज दिला त्यावेळी नोटांचे बंडल माझे हातातच होते. लेखनिक मुटकुळे हे आल्यानंतर त्यांनी मुटकुळे यांना पैसे घेवुन मोजण्यास सांगितले. लेखनिक मुटकुळे यांनी लाचेची रक्कम माझेकडुन स्विकारली, त्याक्षणी दोघांना पथकाने ताब्यात घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, आता पवित्र पोर्टल च्या माध्यमातून काही संस्थेवर शिक्षक भरती होते आहे. त्यात अकोले व संगमनेर सह अनेक संस्थांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. अनेक पात्र शिक्षकांकडून लाखो रुपयांच्या रकमा मागितल्या जात आहे. संस्थेच्या विकासासाठी भिकार्‍यांसारखी रक्कम मागून मोठा भ्रष्टाचार होताना दिसतो आहे. त्यावर अंकुश राखण्यासाठी अशा प्रकारे जर कोणी पैसे मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here