आमदार अमोल खताळ आईसोबत आषाढी वारीत सहभागी; माय-लेकाचा पंढरपूरच्या वाटेवर भक्तीमय प्रवास

0
46

पंढरपूर, दि. ४ जुलै : महाराष्ट्राची हजारो वर्षांची भक्ती परंपरा लाभलेली आषाढी वारी प्रत्येक वर्षी लाखो भाविकांच्या पावलांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. याच भक्तीमय परंपरेत संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी आपल्या मातोश्री सौ. मंगल खताळ पाटील यांच्यासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले, माझी आई गेल्या २६ वर्षांपासून पंढरपूर पायी वारीत सहभागी होत असते. यंदाही आई आषाढी वारीत भक्तिभावाने सहभागी झाली आहे. आज आम्ही मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलमाउलीचं दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान वारीत त्यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारी मार्गावरील थांब्यांवर ते वारकऱ्यांशी संवाद साधत होते. आरोग्य, स्वच्छता, निवारा आणि भोजन या संबंधित अडचणींवर त्यांनी बारकाईने लक्ष दिले आणि यावर शासन दरबारी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले, “वारीमध्ये लाखो वारकरी आपल्या विठ्ठलभक्तीने पंढरपूरकडे प्रवास करतात. परंतु, या प्रवासात त्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्य मानतो आणि शासन दरबारी त्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.”

या पायी वारीत त्यांच्या मातोश्री सौ. मंगल खताळ पाटील या देखील सहभागी होत विठ्ठलभक्तीत मनापासून एकरूप झाल्याचे पाहायला मिळाले. माय-लेकाला एकत्र पंढरीच्या वाटेवर चालताना अनेक भाविकांनी त्यांचे स्वागत केले. या दरम्यान पंढरपूरमध्ये त्यांनी अगस्ती ऋषी महाराजांच्या दिंडीचे मठात दर्शन घेतले. यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, प.पू. महंत रामगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्यासह अन्य महाराज व वारकरी, भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here