नागरिकांना प्रत्यक्ष भेटून पटवून देतायेत ‘व्हिजन’
संगमनेर : नगरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह सर्व उमेदवारांना मिळणारा जोरदार प्रतिसाद हे या निवडणुकीतील नवे समीकरण ठरत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात सुवर्णा खताळ यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून संगमनेरमध्ये खताळ लाट उसळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रचाराचे अवघे काहीच दिवस शिल्लक असतानाच आमदार अमोल खताळ स्वतः तळागाळात उतरले असून, प्रभागनिहाय नागरिकांशी संवाद, पायी भेटी आणि घर-दार मोहीम या माध्यमातून ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अधिक वेगाने करत आहेत. त्यास नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अनेक मतदार आमदार खताळ यांच्याशी प्रत्यक्ष भेटून… साहेब, विजय नक्की तुमचाच! यंदा संगमनेर विकासाच्या मार्गावर जाणार अशी खात्री देत आहे.
उच्चशिक्षित, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुवर्णा खताळ यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठी आत्मीयता निर्माण झाल्याचे दिसून येते. त्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शैक्षणिक व्यवस्था अशा विविध प्रश्नांवर त्या थेट संवाद साधत आहेत. सुवर्णा खताळ यांनी नगरपालिका शाळांची झालेली दुरवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा न मिळणे आदी मुद्द्यांवर चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. संगमनेरचा विकास करायचा असेल, तर मुलांचे भविष्य मजबूत करणे गरजेचे आहे.असे ठाम मत त्या नागरिकांसमोर मांडत आहे.
निवडणूक जवळ येत असताना शहरात दिसणारा उत्साह आणि उमेदवारांच्या सभांना मिळणारी गर्दी पाहता सुवर्णा खताळ यांच्यासह शिंदे गटाच्या उमेदवारांना जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आज अधिक स्पष्टपणे उमटत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, युवा वर्गाचा सक्रिय पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन हे सुवर्णा खताळ यांच्या प्रचारयात्रेचे बलस्थान ठरत आहे.
पुढील पाच वर्षांसाठीचे स्पष्ट विकास व्हिजन…
शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणार
स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट संगमनेर
महिलांसाठी सुरक्षित आणि विकासाभिमुख उपक्रम
नगरपालिका शाळांची उन्नती आणि आधुनिकिकरण
युवकांसाठी रोजगार निर्मितीची नवी दालने








