संगमनेर : शहरातील जोर्वे नाका येथील प्रस्तावित जागेवर उभारण्यात येणारा एसटीपी प्लांट रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवन येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्येवर उत्तर देताना माहिती दिली. तसेच पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचा त्याच जागेचा आग्रह असल्याची टीका आमदार खताळ यांनी केली.
बहुचर्चित एसटीपी प्लांटची प्रस्तावित जागा क्रीडांगणाची आहे, त्यामुळे नागरिकांचा त्याला विरोध आहे. तसेच हा प्लांट स्थानिकांना त्रासदायक ठरणार असल्याने तो इतरत्र हलविण्यासाठी आपण नागरिकांसोबत खंबीरपणे उभा राहणार असल्याचा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला होता.
दरम्यान शुक्रवारी (ता. ३१) आयोजित जनता दरबारात नागरिकांनी एसटीपी प्लांट खेळाच्या ग्राऊंडवर होणार असल्याची तक्रार आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. यावर बोलताना आमदार खताळ म्हणाले, नियोजित एसटीपी प्लांटची जागा आपण बदललेली आहे. पूर्वी जी जागा प्रास्तावित होती त्यासाठी जो १ कोटी रुपयांचा निधी पहिजे होता तो सुद्धा जिल्हा नियोजन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
तसेच आमदार अमोल खताळ म्हणाले, एसटीपी प्लांटच्या प्रस्तावित जागेचा यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचा तो आग्रह होता. परंतु तिथं क्रीडांगणाची जागा आहे. तर ती रद्द करण्याबाबत शब्द दिला होता. प्लांट प्रस्तावित जोर्वे नाक्यावर होण्याऐवजी नवीन जागेवरच होणार असल्याची खात्री आमदार खताळ यांनी यावेळी दिली.
संगमनेरकरांच्या हिताचा निर्णय घेताना प्रास्तावित जागेतील एसटीपी प्लांटला स्थानिकांचा मोठा विरोध होत आहे. अशा परिस्थितीत नवीन जागेवर प्लांटचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. केंद्रात आणि राज्यात महायुती सरकार असल्याने संगमनेरच्या विकासासाठी आवश्यक निधी निश्चितपणे उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.








