संगमनेर : सोशल मीडियामुळे हनीट्रॅपच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आता हनीट्रॅपचे लोण थेट संगमनेरात येऊन पोहचले आहे. परपुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यास वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेरच्या एका नोकरदाराची मागील दोन महिन्यांच्या काळात महिलांकडून फसवणूक झाली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नोकरदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर, अकोले, संगमनेर आणि सिन्नरच्या प्रत्येकी एक अशा तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राजक्ता, कविता व छाया नावाच्या तीन तरूणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनेकांना या महिलांकडून गंडा घालण्यात आला असावा. त्यांनी धमकावून, ब्लॅकमेल आणि मारहाण करून अनेकजणांना कर्जबाजारी केल्याचे बोलले जात आहे. संबंधित महिलांकडून अल्पवयीन मुलींचा सुद्धा वापर झाला असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.
नोकरदार तरुणाची संगमनेर येथील कविता नामक तरुणीसोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर कवितेने त्याला वडगावपान येथे नेऊन प्रेमसंबंधाची मागणी केली. मात्र संबंधित व्यक्तीने आपले लग्न झाले असून दोन मुले असल्याचे सांगत नकार दिला. तरीही कविता त्याला गुप्तता राखण्याचे आश्वासन देत एका लॉजवर घेऊन गेली.
काही दिवसांनी कवितेने आपल्या मैत्रीण छायाचा नंबर पीडितास दिला. तिनेही प्रेमसंबंधासाठी बोलावून एका इसमाशी संपर्क साधायला सांगितले. त्यानंतर पीडित व्यक्ती अकोले तालुक्यातील वीरगाव रोडवरील खडी क्रेशर परिसरात गेला. तेथे खोलीत आणखी एका महिलेशी तो संवाद साधत असतानाच अचानक खोलीबाहेरून दरवाजा बंद करण्यात आला. बाहेर आलेल्या पुरुषांनी त्याला पकडून मारहाण केली.
यानंतर महिलेकडून “ही माझी पत्नी आहे, तिच्यासोबत गैरवर्तन केलेस” असा आरोप करत मोबाइलवर व्हिडिओ शूट करण्यात आला. शिवाय प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये देण्याची धमकी पीडितास देण्यात आली. पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकीही देण्यात आली.
या प्रकारामुळे अखेर नोकरदार तरुण पोलिसांकडे धावला. अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.








