संगमनेरमध्ये शिवजयंती उत्साहात; मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
116
mla amol khatal
mla amol khatal

संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संगमनेर येथे शिवजयंती उत्सवानिमित्त शिवपूजन सोहळा आणि भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आमदार अमोल खताळ पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साष्टांग नमन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.

शिवजयंती हा केवळ एक उत्सव नाही, तर स्वाभिमान, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी आठवणींचा दिवस आहे, असे मत यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी निष्ठा ठेवत, त्यांचे स्वराज्य स्थापनेचे महान कार्य स्मरून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवजयंतीच्या औचित्याने छत्रपती प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज आणि महायुती संगमनेर विधानसभा यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर स्पर्धकांना भगवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेला संगमनेरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धकांचा जोश आणि उत्साह पाहण्यासारखा होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, तसेच सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण संगमनेर शहर शिवमय झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here