माळीपंच ट्रस्टच्या मारुती मंदिरात जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर : शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित स्मारक उभारावे, अशी माळी समाज बांधवांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात सुद्धा आवाज उठवला आहे. या पुतळ्यासाठी आवश्यक तो निधी प्राप्त होताच लवकरात लवकर काम सुरू केले जाईल, असा विश्वास नीलम खताळ यांनी माळी समाज बांधवांना दिला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ व शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप युवामोर्चा जिल्हा ध्यक्ष रोहित चौधरी, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, योगेश सूर्यवंशी, संपत गलांडे, वरद बागुल, अजित जाधव, समीर ओझा, विकास पुंड, शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, संगीता पुंड, सपना जाधव, माळी समाज पंच ट्रस्ट उपाध्यक्ष भारत ढोले, सचिव अभिजीत उर्फ मुन्ना पुंड, विश्वस्त किशोर ढोले, राजू माताडे, बाळासाहेब अभंग यांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. खताळ म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. हे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जाते. सर्व समाज घटकांतील वंचित स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा संगमनेर शहरात असावे, अशी ठाम मागणी माळी समाजाने आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. ही मागणी ते लवकरच पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा उभारावा, अशी मागणी मागील वर्षीच आमदार अमोल खताळ यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
– अभिजीत पुंड (सचिव, माळी समाज पंच ट्रस्ट, संगमनेर)








