आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना
संगमनेर | प्रतिनिधी
महावितरण कार्यालयात वीजबिल, वीज जोडणी, ट्रिपिंग तसेच इतर तक्रारी घेऊन येणाऱ्या वीजग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने सोडवाव्यात. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक आहे, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.
शहर व तालुक्यातील वीजग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरण विभागीय कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महावितरणच्या संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार पाटील यांच्यासह सर्व विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.

सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी संगमनेर विभागाअंतर्गत येणारी सर्व सौर उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच निमोण वीज उपकेंद्र अंतर्गत कर्हे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरणे, तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, घारगाव, कोकणगाव, देवगाव आणि पोखरी हवेली या ९ गावांमध्ये सौर केंद्रांची कामे मंजूर करण्यात आली असून ही कामे संथ गतीने सुरू असून जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्या, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. विभागाअंतर्गत प्रस्तावित असलेल्या संगमनेर आणि निमज येथील 33/11 के. व्ही. नवीन उपकेंद्राच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.
तसेच कोकणगाव, साकूर, हिवरगाव पावसा, निमोण, धांदरफळ, जवळे कडलग या उपकेंद्रात 10 मेगावॉट पर्यंत तसेच कर्जुले पठार, देवगाव, पिंपरणे, तळेगाव येथे 5 मेगावॉट क्षमतेपर्यत वाढ करण्यात आली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
“नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ कार्यान्वित करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा द्या याशिवाय जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आलेल्या सर्वकामांची प्रगती तपासून ती कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा. ग्रामीण भागात सोलर प्रकल्प उभारताना विविध अडचणी येत आहेत. त्या अडचणी शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी पूर्णवेळ वीजपुरवठा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असून टप्प्याटप्प्याने वीज क्षमतेत वाढ करण्यात येत आहे.”
– अमोल खताळ(आमदार संगमनेर विधानसभा)








