नेत्याचा पराभव घडवणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नयेत! – शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे यांचा टोला

0
72

संगमनेर, दि. १५ : केवळ ठेकेदारीसाठी नेतृत्वाचा वापर करणे ही आमची संस्कृती नाही. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना खेळणे बनवून त्यांचा पराभव घडवणाऱ्या सोमेश्वर दिवटे यांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत, असा तीव्र हल्लाबोल शिवसेनेचे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे यांनी केला आहे.

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सोमेश्वर दिवटे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना फटांगरे यांनी प्रसारमाध्यमांना पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “चाळीस वर्षे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी कोणती संस्कृती आणि परंपरा जोपासली, हे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. निधी आणल्याचा दावा तुम्ही करता, पण तरीही अनेक प्रश्न प्रलंबित का राहिले? याचे उत्तर जनतेला द्या. तुमच्या कार्यक्षमतेचा जनतेला अनुभव आल्यानंतरच त्यांनी तुम्हाला घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे फटांगरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

संस्कृती आणि परंपरा जपल्याचा दावा करणारे विसरले मोठे योगदान

शेतकरी सहकारी कारखान्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. भास्करराव दुर्वे, बी. जे. खताळ पाटील यांचे फोटो कारखान्यात लावायला सांगा, अशी उपरोधिक टीका फटांगरे यांनी केली. “संस्कृती आणि परंपरेचे वारसे सांगणाऱ्यांनी या थोर व्यक्तींचा कधी नामोल्लेखही केला नाही. त्यांची महती विसरणाऱ्या नेतृत्वाला आधी जागे करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

संपूर्ण आयुष्य तांबे-थोरात घराण्याच्या लाचारीत घालवलेला काँग्रेस कार्यकर्ता आता नवनिर्वाचित आमदारांना गुलामी न करण्याचा सल्ला देतोय. संगमनेरच्या जनतेने परिवर्तन घडवले असून नवे आमदार कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी कार्यरत आहेत, असे फटांगरे म्हणाले.

“तालुक्यात परिवर्तन झाल्याने तुमच्या सारखे ठेकेदार उघडे पडले आहेत. आता तुमच्यासाठी कोणतेही काम शिल्लक नाही, त्यामुळेच तुम्हीही माजी आमदारांच्या हातातले खेळणे होणार आहात. जर थोडा स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांच्या हातातील खेळणे होण्यापेक्षा घरी शांत बसा,” असा सल्ला त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here