संगमनेर, दि. २ – संगमनेर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्य मालकीचा होता. मात्र काहीं जण जणू हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अश्या प्रकारे कारभार सुरू केला. तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथापे हॉस्पिटल येथे आयोजित ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, वैद्यकीय विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ. अशोक इथापे, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शेतकरी नेते संतोष रोहोम, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुकाप्रमुख रमेश काळे, भाजप सरचिटणीस रोहिदास साबळे आदी उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले, ही निवडणूक नुसती लढवायची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. त्या दृष्टीने सर्वजण सभासद पर्यंत पोहोचण्याचे काम करावे. साखर कारखाना निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे, अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी असे आवाहन करून यानिवडणुकी च्या काळात कारखाना यंत्रणा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.
वसंतराव गुंजाळ म्हणाले, जशी विधानसभा निवडणूक लढवून जिंकली आहे. तशीच संगमनेर सहकारी साखर कारखान्याची सुद्धा निवडणूक लढवून जिंकायची आहे. त्यासाठी धनाजी संताजी पुढारी हे कोणीच आपले उमेदवार राहणार नाही तर या निवडणुकीत सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी हेच उमेदवार राहणार आहेत.
ही निवडणूक महायुती म्हणून नाही तर शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनल या बॅनरखाली लढवणार आहोत. ज्या शेतकऱ्याचा ऊस गळीतला गेला आहे. अशाच ऊस उत्पादकांना निवडणुकीला उभे राहता येईल असेही गुंजाळ यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी भावना व्यक्त केल्या.








