पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा…. मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह… आरोपांच्या फेरीत जोर्वे ग्रामसभा गाजली

0
52

जोर्वे (ता. संगमनेर) : येथे पार पडलेली ग्रामसभा चांगलीच गाजली. गावाच्या विकासासाठी मिळालेल्या निधीच्या खर्चावर गंभीर प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी सरळसरळ जाब विचारला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामसभा रणांगणात रूपांतरित झाली. मागासवर्गीय आणि आदिवासी घटकांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा नेमका वापर कुठे झाला, यावर उत्तर देण्यात सरपंच आणि प्रशासन अपयशी ठरले.

गेल्या अडीच वर्षांपासून गावातील निधीचा गैरवापर होत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी उपस्थित केले. सामान्य जनतेकडून कररूपात गोळा होणारा पैसा शासनाकडून ग्रामपंचायतीकडे गावविकासासाठी दिला जातो. मात्र, त्याचा उपयोग कोणत्या कामांसाठी झाला, याबद्दल ग्रामपंचायतीकडे कोणतीच स्पष्टता नव्हती. त्यामुळेच संपूर्ण गावकरी या ग्रामसभेसाठी एकवटले होते.

ग्रामसभेच्या वेळी प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावणे, ढकलाढकली करणे, काही ठिकाणी मारहाण करण्याचे प्रकारही घडले. या प्रकारामुळे ग्रामसभा अक्षरशः गोंधळातच पार पडली. सरपंच आणि ग्रामसेवकांना लाखो रुपयांच्या निधीच्या वापरासंदर्भात विचारलेले प्रश्न अनुत्तरितच राहिले. विकासकामांचे फुगवलेले खर्च, खरेदीसाठी कोणतेही पारदर्शकतेचे प्रमाण नसणे, निधी दुसऱ्याच खात्यात वर्ग होणे, असे अनेक प्रकार समोर आले.

परिस्थिती इतकी बिघडली की, उपसरपंच आणि सदस्यांनाही आपली असहायता व्यक्त करत “आम्हालाही काहीच माहिती दिली जात नाही, कोणते सामान घेतले जाते, कोणाकडून घेतले जाते, निधी कुठे वापरला जातो याचा आम्हालाही पत्ता नसतो,” असे सांगावे लागले. गावात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, शिवीगाळ, झटापट झाली, आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी ही घटना दुर्दैवी आणि लाजिरवाणी असल्याचे मत मांडले.

या ग्रामसभेत सुरेश थोरात, सत्यजित थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर, जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव, दत्तू नाना काकड, शुभम दिघे यांसह अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला.परंतु, सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. परिणामी, ही ग्रामसभा गावाच्या इतिहासातील अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here