मुंबई (४ मार्च) : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गानेच व्हावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध नेत्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यापूर्वी या रेल्वे मार्गाला राज्याचे महसूल मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. अमोल खताळ पाटील यांनी विरोध दर्शवला अशी चुकीची माहिती समाज माध्यमांवर पसरवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात हा रेल्वे मार्ग आर्थिक दृष्ट्या न परवडणारा असल्याकारणाने बदलला जात आहे अशी माहिती आ. सत्यजित तांबे यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याने पुढील पावले उचलण्याचे ठरले आहे. लोकांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत झाला. तसेच लवकरच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिल्लीतील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या मागणीवर ठोस चर्चा केली जाणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प
नाशिक आणि पुणे या दोन्ही औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांना जोडणारा हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी मोठ्या सुविधांचा लाभ देणारा ठरेल. प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतुकीला नवीन गती मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी सर्वपक्षीय सहमतीने ठोस पावले उचलली जातील, असे बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीला मा.मंत्री माणिकराव कोकाटे, आ. दिलीप वळसे पाटील, आ. सत्यजित तांबे, आ. शरददादा सोनवणे, आ. बाबाजी काळे, आ. अमोल खताळ पाटील, तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे, खा. भाऊसाहेब वाकचौरे आणि खा. राजाभाऊ वाजे यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.








