माझ्या हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही- आ. खताळ

0
206

आमदार अमोल खताळ यांनी माजी लोकप्रतिनिधींवर साधले शरसंधान

संगमनेर : गेल्या काही दिवसांपासून पराभवामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या माजी लोकप्रतिनिधींनी माझ्यावर केलेल्या टीका-टिपण्यांना आता जनतेनं गांभीर्यानं घेणं सोडलं आहे. “हिंदुत्वाचा बुरखा” घालून जे आरोप माझ्यावर केले जातात, त्यातून हिंदुत्व आणि बुरखा या दोन शब्दांची सांगड घालण्याची त्यांना जास्तच घाई झालेली दिसते. आम्हाला हिंदुत्व शिकण्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका आमदार अमोल खताळ पाटील यांनी चाळीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींवर केली.

आमदार खताळ म्हणाले की, आमदार झाल्यापासून संगमनेर तालुक्यात कुठलाही हिंदू-मुस्लीम वाद घडलेला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये एकही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, आपल्या चाळीस वर्षांच्या कार्यकाळात आपण नेहमीच दोन समाजात फूट पाडणारे व द्वेष पसरवणारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुमची जी दहशत आणि दादागिरी होती, ती मोडून काढण्यासाठीच या तालुक्यातील जनतेने तुमचा पराभव केला. त्यामुळे तुम्ही वैफल्यातून माझ्यावर टीका करत आहात. मात्र आम्ही तुमच्या टीकेला येणाऱ्या काळात विकासाच्या माध्यमातून नक्कीच उत्तर देऊ.” असाही इशारा आ. खताळ यांनी माजी लोकप्रतिनिधींना दिला.

अमली पदार्थ तस्करीसंदर्भात आरोप करणाऱ्या माजी आमदारांचा उल्लेख करताना आमदार खताळ म्हणाले की, “तुमच्या कार्यकाळात संगमनेर तालुका गुन्हेगारीचं केंद्र बनला होता. त्याबाबतची आकडेवारी पोलीस ठाण्यातून मागवली आहे. तुम्हीही ती माहिती मागवा, मग खरे सत्य जनतेसमोर येईल. संगमनेरची ओळख त्या काळात ‘गांजाचे केंद्र’ म्हणून बनली होती. अवैध कत्तलखाने आणि धंद्यांना कुणाचे आशीर्वाद होते, हे जनतेला ठाऊक आहे.” तुम्ही या तालुक्यात चाळीस वर्ष हे पाप केल्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसवले असल्याची टीका आमदार खताळ यांनी केली.

तसेच आमदार खताळ पुढे म्हणाले, माझ्या कार्यकाळात मात्र कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, चुकीचा गोष्ट करणाऱ्यांना कधीच पाठबळ दिले नाही, त्यांच्यावर पोलिसात कारवाईच केली. माझ्या सूचनेनुसार संगमनेर शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत. अशा सक्त सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी ठणकावून सांगत संगमनेर हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असेही आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here