संगमनेर : नगरपरिषद निवडणुकीचे औचित्य साधत संपूर्ण शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. महायुतीचे उमेदवार प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधत असतानाच, विशेष आकर्षण ठरत आहे ते आमदार अमोल खताळ यांचे दमदार आणि धडाकेबाज प्रचार दौरे. आमदार असूनही साधेपणाची कास धरणारे खताळ प्रभागागणिक भेटी देत नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या दिशेवरील चर्चा करत आहेत. त्यामुळे शहरात आज ‘खताळ वादळ’ अनुभवायला मिळत असल्याची चर्चा जोरात आहे.
शहरातील विविध भागांत आमदार खताळ यांनी केलेल्या भेटीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जबरदस्त उत्सुकता दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागात ते आपुलकीने संवाद साधताना दिसतात. घरगुती भाषेत, विनम्रतेने आणि लोकांच्या मनात शिरणाऱ्या शैलीत ते प्रश्न ऐकताच त्वरित उपाययोजना कशा करणार याची माहिती देतात. त्यांच्या या सर्वसमावेशक आणि मोकळ्या संवादामुळे नागरिकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसतो आहे. विशेष म्हणजे, शहरातील वयोवृद्ध, गृहिणी, तरुण, व्यावसायिक आणि पहिल्यांदाच मतदान करणार्या नवमतदारांमध्येही आमदार खताळ यांच्याबद्दलचा उत्साह पाहण्यासारखा आहे.आमदार असूनही इतकी साधी राहणी आणि इतकं सहज वागणं आजकाल क्वचितच दिसतं, अशी प्रतिक्रिया अनेक जण देताना दिसतात. त्यांच्या भेटीत काही जण समस्या मांडतात, काही विकासाबाबत सूचना देतात तर काही जण थेट कौतुकाचा वर्षाव करतात.
महायुतीचे उमेदवार आपल्या प्रभागात झपाट्याने प्रचार करत असताना, अमोल खताळ यांचे प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांना खंबीर पाठींबा देणे हा या निवडणुकीतील सर्वात प्रभावी घटक ठरत आहे. शहरात त्यांच्या प्रचार मोहीमेची गती अशी आहे की एखाद्या प्रभागातील भेट संपवून ते दुसऱ्या प्रभागात पोहोचताच जमलेल्या गर्दीत नवचैतन्य निर्माण होते. एकूणच, संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत आमदार अमोल खताळांच्या सक्रिय सहभागामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जनसंपर्क, विकासाचा स्पष्ट रोडमॅप आणि साधेपणा या तीन गोष्टींनी त्यांची मोहीम अनोखी ठरत असून, संगमनेरमध्ये सध्या ‘खताळ वादळ’चं वर्चस्व असल्याचं चित्र कायम आहे.








