संगमनेर : ज्यांनी कधी राजकारणाचा अभ्यास केला नाही, राजकारण काय असतं हे ज्यांना माहीत नाही, असे पात्रता नसलेले आणि आपला व्यवसाय टिकावा म्हणून प्रयत्न करणारे पदवीधर आमदारांचे स्वयंघोषित पुढारी, जर सर्वसामान्यांचे काम करणाऱ्या आमदारांवर टीका करत असतील, तर ते स्वतःचं हसू करून घेत आहेत. त्यांच्या अंगात जर खरी नैतिकता असेल, तर त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका करण्याऐवजी, न केलेल्या कामांबद्दल संगमनेरच्या सर्वसामान्य जनतेची माफी मागावी, अशी जळजळीत टीका माजी उपनगराध्यक्ष व भाजप नेते जावेद जहागीरदार यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार म्हणाले की, संगमनेर नगरपालिकेत गेल्या ३० वर्षांपासून आपल्या मामांची एकहाती सत्ता आहे. तसेच आपली आई सन २००८ पासून नगराध्यक्ष असताना, त्याच वर्षी २% शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामांवरील शास्तीबाबतचा ठराव सभागृहात मंजूर करून संपूर्ण जिल्ह्यात फक्त संगमनेर नगर परिषदेत शास्ती लावला जात होता. आपल्या मातोश्री २०२१ पर्यंत नगराध्यक्ष असताना, तुम्ही यावर एक शब्दही बोलला नाही.
तुमचे मामा महाराष्ट्र शासनात मंत्री असताना आणि तुमचे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार असताना, त्यांनी कधीही विधानसभेत वा विधान परिषदेच्या सभागृहात या अन्यायकारक घरपट्टी आणि शास्तीबाबत एक शब्दही काढला नाही. उलट अन्यायकारक वसुलीसाठी सरकारी यंत्रणांचा वापर करून नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले गेले, मालमत्ता सील करून जप्त करण्यात आल्या आणि वसुली सुरू झाली. त्यामुळे तुमच्या मामा, आई आणि वडिलांच्या जुलमी कारभाराला कंटाळून संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने आमदार अमोल खताळ यांना निवडून दिलं.
४० वर्षांत न सुटलेले जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, तसेच संगमनेर शहरातील शास्तीकरासंदर्भातील मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे तुमच्या पोटात दुखू लागलं आहे. आपण केलेले पाप उघड होऊ नये म्हणून, न केलेल्या कामाचं फुकटचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे धडपड करत आहात. हे सर्व संगमनेर शहरातील सुजाण जनतेला माहिती आहे. अन्यायकारक शास्ती लावणारे, सत्तेत असताना सर्वाधिक घरपट्टी दर लावणारे तुम्हीच होता, म्हणूनच या शहरातील जनतेने तुम्हाला धडा शिकवला, अशी टीका जहागीरदार यांनी केली आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी नसताना, पाच जिल्ह्यांतील तालुक्यांमधील पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, केवळ संगमनेरातच लुडबुड का करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. या पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमधील पदवीधरांचे प्रश्न ते कधी विधान परिषदेत मांडणार, असा प्रश्न संगमनेर तालुक्यातील जनतेने उपस्थित केला आहे. यामागे त्यांच्या घराणेशाहीचे राजकारण असल्याचे स्पष्ट दिसते. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला आणि तालुक्यातील जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडून मार्गी लावत आहे, हे त्यांना पाहवत नाही, अशी जोरदार टीका जावेद जहागीरदार यांनी केली आहे.








